Thursday, May 14, 2015

काव्य अक्षता....४


माझी पुतणी,
चि.सौ.कां. प्रियांका आणि चि. सागर
यांच्या दिनांक ११ मे २०१५ रोजी संपन्न झालेल्या शुभ विवाहाप्रित्यर्थ उधळलेल्या
काव्य अक्षता
श्री कृपेने हा खेळ सजला.
महादेवा ते वंदन तुजला.
रवळनाथाने दिधले यांना,  समृद्धीचे दान.
सावधान शुभमंगल सावधान २  || १||

आनंदी – लक्ष्मण , आजी – आजोबा.
सुमन – मारुती , आई – बाबा.
भैय्या निलेश ची ही लाडी , बहिण ‘प्रियांका’ छान.
सावधान शुभमंगल सावधान २  || २||

काका – आत्या , मावशी – मामा.
कौतुक करण्या  झाले जमा.
लहान – थोर , पै – पाहुणे , गोतावळा हा महान.
सावधान शुभमंगल सावधान २  || ३||

ही लेक लाडकी आई-बापाची.
आज होईल पाहुणी माहेराची.
स्व-जनांचे डोळे झरती, आठवून तिच्या विरहान.
सावधान शुभमंगल सावधान २  || ४||

दिन हा मंगलमय जो आला.
आसमंत ही  सुखे गुंजला.
‘सागर’ वरे नवरी ‘प्रियांका’ , सोहळा भव्य महान.
सावधान शुभमंगल सावधान २  || ५||

रचना आणि गायन:
श्री. बाळासाहेब तानवडे
०१ मे २०१५


Wednesday, November 6, 2013

अधुरा प्रवास


दिनांक २४/०९/२०१३ रोजी आमची बहीण
 सौ. छाया सुबराव पाटील
यांना देवाज्ञा झाली.
ईश्वर तिच्या आत्म्यास चिरशांती देवो.  
 अधुरा प्रवास  
लाडकी तु बहीण माझी मायेची छाया.
सर्वगुणसंपन्न , जणु विधात्याची दया.
लहानशीच मूर्ती तुझी पण active भारी.
वावग न खपणारी,तुझा दरारा घरी–दारी.

मायबाप असूनही बालपणी झाल्या पोरक्या दिशा दाही.
मग आत्या अन आक्काच झाल्या तुझ्या सर्व कांही.
सुख - दुखी राहिला तुझ्या सोबत पांडुरंग खडा.
मग फुलून गेली जीवन बाग,पडला नक्षत्रांचा सडा.

पण यमाची नजर चुकवून वेड वहान त्याच आडव आल.
अन सकलांची याचना न सुनता तुला अवेळी घेऊन गेल.
चोविस दिसांची तुझीही आर्जवे पार मोडकळीस गेली.
अखेर स्वर्गाची हमी देवून तुला पुण्यलोकी नेली.

पाठीसी लावून तुझ्या ग माई आलो मी पाठ.
तुझ्या सवेच गाठायचा होता जीवनाचा काठ.
मात्र टाकून गेलीस आम्हास खूपच दूर - दूर.
देऊन कायमचा दुरावा अन नयनांना महापूर.

तस मिळवलं होतस जवळ-जवळ सर्वच सुख.
पण पाहायचं राहून गेल एकुलत एक सुनमुख.
शेवटी नाही केलस कोणाशीच बोलण-चालण.
अन अचानक झाल तुझ सर्वांस सोडून जाण.

तुला माई अजून खुप जगायचं होत.
कष्ट संपणारच होत,आता सुखात राहायचं होत.
का तुटला असा तुझा अवेळी मधूनच श्वास?
माई ! का राहिला तुझा हा अधुरा प्रवास? 
माई ! का राहिला तुझा हा अधुरा प्रवास? 

कवी : बाळासाहेब तानवडे

२४/०९/२०१३

Sunday, January 13, 2013

शर्मनाक

बस   नव्हे   ती   खुद्द   काळ   होता. 
वासनांचा  आगडोंब    जाळ    होता. 
जणु    असुरी   शक्तीचा   भास होता. 
सुटकेचा   केविलवाणा  ध्यास  होता. 

आक्रोश    आक्रोश   निनादत ओसंडले.
अंग-अंग, रंध्र-रंध्र  तिचे हो रड-रडले. 
दया   राहिली  दूर दूर अज्ञातवासात. 
वासनांनी    पुरे  पुरे  थैमान   मांडले. 

माणुसकीस       काळीमाच   फासला.
विखारी     डंख    मातीसच    डसला. 
इज्जतीचा     पुरता    केला फालुदा. 
जगण्यावर     सुद्धा  आणली    गदा. 

अशी शर्मनाक ना कधी घटना घडावी, 
जीने   शरमेला    ही    शरम   वाटावी. 
पापाच्या  पित्तरालाही    कधी    अशी, 
जबर  शिक्षा   म्हणुनही   ना मिळावी.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १४/०१/२०१३
http://kavyarangmaze.blogspot.com/Friday, October 19, 2012

मराठी माणसा...

मराठी माणूस म्हणतात धंद्यात कमी.
केला  धंदा तरी   नाही सुयशाची हमी.
आता  द्यायचाय छेद , या समजुतीला. 
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला. 

उच्च  शिक्षणाच्या उत्तुंग पदव्या घेतो.
आयुष्यभर नोकरीतच धन्यता मानतो.
आता विचार धाराच बदलायचीय बाळा.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.

रिस्क जोखीम म्हणून टाळतच आला. 
जीवनात कुठे नाही रिस्क ते तर बोला.
आता हा  धाडसी  निर्णय पक्का झाला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.

एवढ्यावरच  समाधान तुजला नसावं.
आता   सुंदरशा  स्वप्नांच जग सजावं.
सज्ज हो सारी दुनिया कवेत घ्यायला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला. 

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे १९/१०/२०१२ 
http://kavyarangmaze.blogspot.in/

Tuesday, October 9, 2012

मोरा रे मोरा


मोरा रे मोरा , फुलव सुंदर पिसारा.
आले काळे ढग,आला गारगार वारा.

मोरा रे मोरा, आता नाच तर खरा.
आला बघ पाऊस, सवे टपटप गारा.

मोरा रे मोरा, काय बुवा तुझा थाट.
थुईथुई नाचात करशी,सर्वांवर मात.

मोरा रे मोरा, डोईवर डुले राजस तुरा.
सौंदर्याचा मिळाला जणू ताजच तुला.

मोरा रे मोरा, तुझा रुबाब फारच छान.
म्हणूनच तर आहे तुला राजाचा मान.

मोरा रे मोरा,गातोस मियाव मियाव गाणी.
पण नाचताना कारे तुझ्या डोळ्यात पाणी?

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे ०९/१०/२०१२
http://kavyarangmaze.blogspot.in/

Monday, September 24, 2012

लवंगी मिरची कोल्हापूरची


ती: लवंगी मिरची मी कोल्हापूरची. 

असं रोकून पावणं पाहू नका. 

आता वाईच करा इचार दाजी. 

म्हन्ते सोसलं का माझा झटका||धृ|| 


कोरस: हिचा बा हाय तालेवार , हिचा भाऊ पैलवान. 

औंदा लगीन जरूरी हाय,पायजे हिला गबरू जवान. 


ती: रंकाळा, टाकाळा,नागाळा,पन्हाळा, 

मला बाई हाय या समद्याची वड. 

गुजरीत जाऊन, साज मला घेऊन, 

फिरवावा लागल त्यो म्हादार रोड||१|| 


लवंगी मिरची मी कोल्हापूरची. 

असं रोकून पावणं पाहू नका. 

आता वाईच करा इचार दाजी. 

म्हन्ते सोसलं का माझा झटका||धृ|| 


कोरस: हिचा बा हाय तालेवार , हिचा भाऊ पैलवान. 

औंदा लगीन जरूरी हाय,पायजे हिला गबरू जवान. 


ती: शाहूपुरी,लक्ष्मीपुरी,राजारामपुरी, 

हाईत साऱ्या पेठत हाटेलं भारी. 

पावन बसाव लागल जवळ खेटून. 

देवुन रश्याची लज्जत न्यारी||२|| 


लवंगी मिरची मी कोल्हापूरची. 

असं रोकून पावणं पाहू नका. 

आता वाईच करा इचार दाजी. 

म्हन्ते सोसलं का माझा झटका||धृ|| 


कोरस: हिचा बा हाय तालेवार , हिचा भाऊ पैलवान. 

औंदा लगीन जरूरी हाय,पायजे हिला गबरू जवान. 


ती: औन्दाच संपलय बाई वरीस अठरा. 

ज्वानीला माझ्या वाढलाय खतरा. 

दाजीबा आता वेळ लई दौडू नका. 

काढा आता उद्याचा म्हुतूर पक्का||३|| 


लवंगी मिरची मी कोल्हापूरची. 

नुसतं रोकून पावणं पाहू नका. 

आता कशाला त्यो इचार दाजी. 

म्हन्ते सोसलं हो माझा झटका||धृ|| 


कोरस: हिचा बा हाय तालेवार , हिचा भाऊ पैलवान. 

औंदा लगीन जरूरी हाय,पायजे हिला गबरू जवान

कवी : बाळासाहेब तानवडे 

© बाळासाहेब तानवडे – २५/०९/२०१२
http://kavyarangmere.blogspot.com/