Sunday, October 31, 2010

प्रार्थना

नमीतो तुजप्रार्थतो तुज ,तुच आहे दाता अमूचा,
तुज वाचून व्यर्थ आहे ,संसार हा जरी सुखाचा,

नामात तुझ्या सदा असावेचित्तात रूप तुझे वसावे.
नयानांच्या ज्योतिना आमच्या तुज पाहण्या तेज गवसावे.

कधी होशी तू राधेचा  शाम ,कधी बनसी तू जानकीचा राम.
साथ राहो सदा तुझी जरी असु आम्ही भाबडे अन आम.

हातांना आराम नसावा ,मनात सद्विचारांचा राहो ठेवा.
अथक प्रयत्नांती द्यावा गोड यशाचाच मेवा.

जीवनाचा ध्यासतुच विसावा , जगण्याची आस तुच दिसावा.
जागो जागी, क्षणो क्षणी  तुझाच नेहमी वास असावा.

कवी : बाळासाहेब तानवडे

 © बाळासाहेब तानवडे १६/११/२०१०

मनाचे गूढ




मनाचे  गूढ  कोणा  नाही.
विचारांती  कुट प्रश्नच  राही.
भल्या  भल्यांनी  दिली  ग्वाही.
हाती  ना  आले  विशेष   कांही.

मनाचे  गूढ  कोणा  नाही.
जो  तो  आपल्या  परीने  शोधू  पाही.
पुरा  जन्म  व्यर्थ  जाई.
पण  गूढ  मात्र  कायम  राही.

मनाचे  गूढ  कोणा  नाही.
संतांची  नजर  ताडून  पाही.
त्याचेच  अस्तित्व  चराचरी.
मनी  अंशी  वसतो  हरी.
कवी : बाळासाहेब तानवडे

© बाळासाहेब तानवडे३०/११/२०१०

पुढच पाऊल



प्रत्येकाला हवा हवासा 
अमूल्य सुंदर जन्म देता.
बालपणीच्या कोवळ्या स्वप्नांना,
सप्तरंगी रंग देता.

जीवापाड जपताना ,
सुख - दु:खाना अतूट साथ -संग देता.
शिक्षण देऊन मोलाचं, 
भावी सुख स्वप्नात तुम्ही दंग होता.

तारुण्याचा बहर सावरताना,
भविष्याची सुखस्वप्ने न्याहाळताना.
अचानक प्रेम स्वरूप समोर येते ,
मग आमच्या स्वप्नांना सत्य रूप येते.

प्रेमाचा अंकुर मोहरतो ,
प्रेमाचा वसंत बहरतो.
मग एक दुसऱ्या वाचून न जगण्याच्या,
अणाभाकांचा, कहर होतो.

ना जातीला स्थान असतं ,
ना धर्माचं भान असतं .
प्रेमाच्या अमूल्य क्षणासाठी ,
आमच जीवन सार गहाण असतं.

तुमच्या अन गणगोतांच्या विरोधाला,
तलवारीची धार असते.
विलग न होण्याचे धैर्य,
सर्व कक्षांच्या पार असते.

नकळत पुढच पाऊल टाकून बसतो ,
परतीचा मार्ग सर्व बाजूने खचतो.
तेंव्हा गरज असते तुमच्या खंभीर साथीची,
साथ हवी असते सार्थ विश्वासाची.

तेंव्हाच तुम्ही पाठ फिरवता ,
नात्याची घट्ट गाठ निरवता.
समाजाच्या निरर्थक भीतीपोटी ,
जपलेल्या अतूट नात्याला क्षणात पूर्ण विराम देता.

असे किती दिवस चालत राहावे?
पोटच्या गोळ्यांना जितेपणी मारत राहावे.
मागच्यानी केले तेच परत करत रहावे. 
संकुचित वर्तुळात फिरत रहावे.

म्हणून जाती -धर्म भेद दूर सारा,
गढूळ मनांना शुद्ध प्रेमाने भरा.
माणुसकी हाच मुळ धर्म आपला ,
ज्याने समानता सद्गुण जपला.

कवी : बाळासाहेब तानवडे 

© बाळासाहेब तानवडे २३/१०/२०१०

वादळ

तुझ्या आगमनाची चाहूल लागली.
मने जशी फुलपाखरू झाली.
बालपणीच्या लडिवाळ लीलांनी तुझ्या.
घरा – दाराला आनंदाची भरती आली.

तुझे बाल हट्ट पुरवता – पुरवता.
शिक्षणाचे बाळकडू भरवता – भरवता.
तारुण्याच माप कधी ओलांडलस, ते समजलच नाही.
प्रेमाचा आलाप कधी आळवलास, ते उमजलेच नाही.

आपला जोडीदार स्वताच निवडला.
वर संशोधनात वेळ नाही दवडला.
एक – दुसऱ्यांना तुम्ही समजून घेतले.
आम्ही तुमचे कांहीसे उमजुन घेतले.

पण तुझी निवड कांहीशी अलग होती.
समाज्याच्या नियमाशी न सलग होती.
परिस्थितीची दिली तुला सर्वानी जाण.
तुलाही आल वास्तवाचं काहीस भान.

पण लग्नाच्या गौप्यस्फोटाने केला कहर.
आमचे जीवन झाले, जसे जहर.
शांत घराची रणभूमी झाली.
अखेर तुझी घराला कायमची कमी झाली.

तुझ्या स्वप्नांची फुले झाली.
आम्ही दिलेल्या स्वातंत्र्यामुळे झाली.
मात्र आमची जीवन बागच कोमेजली.
तुला आमची कधी मनेच नाही समजली.

तुझे सुख तू पाहिलेस.
आम्हाला घोंगावणाऱ्या वादळाला वाहीलेस.
तुझ्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्या .
तू मात्र आम्हास समाजाच्या आयुष्यभरच्या चपला दिल्या.

शाहू – फुलेंचे विचार आम्ही मानतो गहन.
पण जनशक्ती पुढे आम्ही पडतो खुपच लहान.
मुठभरांसाठी ठरेल तुझे कृत्य महान.
पण उरलेल्यांसाठी आम्ही ठरू पायची वहान.


कवी : बाळासाहेब तानवडे



 © बाळासाहेब तानवडे २५/१०/२०१०