Monday, August 22, 2011

रेव पार्टी (लावणी)....(Rave Party)


ती: टेनटी फोर सेवन कामाचं आलं बाई फॅड.
जादा पैक्यापाई झाल्यात आता समदीच मॅड.
सीसीडी अन् बरिस्त्यात रंगत्यात गप्पांच फड.
मी म्हणती जाईन पर दाजीबाच अडतंय घोड. 


कोरस: काम लई झालं बाई आता इक एंड आला.
      लवकर चला बाई आता बिगी-बिगी चला.
  पोर चालल्यात धमाल  रेव पार्टीला.

ती :सख्या चल , राया चल जाऊ अपुनबी त्या रेव पार्टीला.

पोरा – पोरींच फेसबुक असतंय.
टीवटर आणि आर्कुटबी असतंय.
म्हण तेच्यावर गुलूगुलू करत्यात.
रेव पार्टीला जागी एका जमत्यात.
 धूम धमाल असते मौज मस्तीला.
सख्या चल , राया चल जाऊ अपुनबी त्या रेव पार्टीला||१||

कोरस: काम लई झालं बाई आता इक एंड आला.
लवकर चला बाई आता बिगी-बिगी चला,
पोर चालल्यात धमाल  रेव पार्टीला.

ती :हातामंदी हे हात कीव धरू.
 डोळ्यामंदी हे डोळ कीव भरू.
डान्स धमाल डिस्को करू.
पार्टीमंदी त्या खान-पिणं करू.
नसल हद्द त्या मादक धुंदीला.
सख्या चल , राया चल जाऊ अपुनबी त्या रेव पार्टीला||२||

कोरस: काम लई झालं बाई आता इक एंड आला.
लवकर चला बाई आता बिगी-बिगी चला,
पोर चालल्यात धमाल  रेव पार्टीला.

शाहीर : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २२/०८/२०११
Rave Party- Marathi Lavani

Saturday, August 13, 2011

बुलंद आशा



मलाही उंच आकाशात उडायच आहे,
पण पंखात बळ कोठून आणू?

मलाही उंच शिखरं गाठायची आहेत.
पण पायात बळ कोठून आणू?

त्यांना नशिबवान म्हणावं का?
जे आज उंच आकाशात भरार्‍या मारतात.

हो कारण त्यांचा आज चांगला आहे.
पण मी आज का निराश व्हावं?

कारण सगळेच दिवस सारखे नसतात.
उद्या माझ्याही पंखात वीज संचारेल.

माझ्याही पायात सामर्थ्य येईल.
कदाचित उद्या मी आकाशाला गवसणी घालेन.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २०/०६/२०११

(Buland Asha)

Monday, August 1, 2011

माझा गांव


प्रातःकाळीच्या सूर्याची प्रभा दिसे सोनेरी छान.
चारी बाजूनी निसर्गाची , आहे मुक्त उधळण.

धनवान ,गुणीजन गाजे पंचक्रोशीत नाव.
असा सर्वांग सुंदर आहे, देवर्डे माझा गाव.

असा सुजन लाभला गावच्या प्रत्येक आळीत.
स्वच्छ,तंटामुक्त गाव राहील कित्येक पर्वात.

जातपात भेद नाही भाईचारा भरून राही.
मना-मनात ,घरात रामराज्य नांदू पाही.

आहे मेहेरनजर खास, साऱ्या ग्रामदैवतांची.
नाही धन-धान्या तोटा, लयलूट समृद्धीची.

सुखसोई साऱ्या झाल्या वीज,पाणी,वाहतूक.
शिक्षणाचे केंद्र झाले, किती करावे कौतुक.

हिरण्यकेशीचा प्रवाह वाहतसे बारमाही.
शेत शिवार फुलते भात ,ऊस ठाई-ठाई.

चिरा इथला प्रसिध्द दूर गावो-गावी जाई.
भुईमुग ,मेसकाठी, काजू मस्त चलन देई.

म्हाई होई दरसाली रवळनाथ देवाची.
पाहुणे-राउळे जमती,येई आनंदा भरती.

चव्हाटी रंगे होळी घरोघरी पुरण पोळी.
फुलतो गोठण लुटण्या सोनं दसऱ्याच्या वेळी.

विठ्ठलाच्या राउळीं या,सदा वैष्णव भजती.
आषाढी-कार्तिकीची वारी,नाही कधी चुकविती.

गायराना गायी-म्हैशी चरुणी तृप्त होती.
गौळदेव ओढ्यात डुंबती,अंगी भरून मस्ती.

माझे नसीब हो थोर, मज लाभला हा गाव.
उतराई होईन मी, वाढवून कीर्ती, नाव.

माझ्या गावाची प्रगती होवो दिवसागणिक.
सर्व क्षेत्रांत राहो माझ्या, देवर्डेची उतुंग झेप.

 कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ०१/०८/२०११
Maza Gaav