Sunday, June 19, 2011

कल्प भास



सांगू कशी प्रिया मी, हे गोड कल्प भास.
मी प्रेमवेडी राधा, तू प्राणसखा खास||धृ||

नयनास भार होते. स्वप्नील कल्पनांचे.
तुज पाहता सख्या रे,जणू स्वप्न रूप साचे.
मी मुरली रे कान्हाची,तू सुरांचा आभास||१||

सांगू कशी प्रिया मी, हे गोड कल्प भास.
मी प्रेमवेडी राधा, तू प्राणसखा खास.

बहरात यौवनाच्या, मी धुंद फुल व्हावे.
गंधित या फुलाने, तू स्वैर-भैर व्हावे.
ही पाकळी मिटावी,तुझा फुलारून श्वास||२||

सांगू कशी प्रिया मी, हे गोड कल्प भास.
मी प्रेमवेडी राधा, तू प्राणसखा खास.

गीतकार : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १९/०६/२०११
Kalp Bhas

Tuesday, June 14, 2011

विठ्ठला



विठ्ठला, विठ्ठला.
आषाढी-कार्तिकी वारीत देवा,
पूर भक्तीचा दाटला.

विठ्ठला, विठ्ठला.
संत मांदियाळी मोठी देवा,
तयास संकटी भेटला.

विठ्ठला, विठ्ठला.
रुसून गेली रखुमाई देवा,
ठाव कधी ना लागला.

विठ्ठला, विठ्ठला.
भेट पुंडलिका घेण्या देवा,
वाळवंटी युगे थांबला.

विठ्ठला, विठ्ठला.
नाम तुझे घेता देवा,
अंधार मनीचा मिटला.

विठ्ठला, विठ्ठला.
दर्श तुझे घेता देवा,
अभिमान मिथ्या सांडला.

विठ्ठला, विठ्ठला.
संग तया दिला देवा,
तुजला जो जो भजला.
  
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १४/०६/२०११
Vithala