Showing posts with label बालगीते. Show all posts
Showing posts with label बालगीते. Show all posts

Tuesday, October 9, 2012

मोरा रे मोरा


मोरा रे मोरा , फुलव सुंदर पिसारा.
आले काळे ढग,आला गारगार वारा.

मोरा रे मोरा, आता नाच तर खरा.
आला बघ पाऊस, सवे टपटप गारा.

मोरा रे मोरा, काय बुवा तुझा थाट.
थुईथुई नाचात करशी,सर्वांवर मात.

मोरा रे मोरा, डोईवर डुले राजस तुरा.
सौंदर्याचा मिळाला जणू ताजच तुला.

मोरा रे मोरा, तुझा रुबाब फारच छान.
म्हणूनच तर आहे तुला राजाचा मान.

मोरा रे मोरा,गातोस मियाव मियाव गाणी.
पण नाचताना कारे तुझ्या डोळ्यात पाणी?

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे ०९/१०/२०१२
http://kavyarangmaze.blogspot.in/

Friday, February 24, 2012

देवा मला लवकर मोठ्ठं कर


रोजच अभ्यास , रोजच शाळा 
रोजच जाण येण येई कंटाळा 
दफ्तराच वजन तु छोटं कर 
देवा मला लवकर मोठ्ठं कर 

अभ्यासा साठी आईची किटकिट
मस्ती बद्दल ती बाबांची मारपीट 
मारकुट्या दादाचा हात घट्ट धर
देवा मला लवकर मोठ्ठं कर

News channel बाबांचं लाडकं 
आईला आवडतं serial रडकं 
सर्वानाच cartoonच वेड भर
देवा मला लवकर मोठ्ठं कर 

दुधासवे Complan पितो घटघट
John,सलमान सारख वाढव पटपट
स्वप्नातल्या वचनाचा नको विसर
देवा मला लवकर मोठ्ठं कर

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – २४/०२/२०१२ 

Saturday, March 12, 2011

मनीमाऊ


मनीमाऊ-मनीमाऊ,
तुझं अंग किती गं मउ.
पायात सारखी घुटमळते,
करते माऊ माऊ.

भाचा तुझा वाघोबा,
मावशी तु त्याची.
पण केवढा मोठा तो,
मात्र तु छोटी कशी?

खेळायला कोणी नाही,
म्हणून चुपचाप बसतेस.
उंदीर भाऊ आला तर मग,
त्याला पळवून का लावतेस?

शेजारचा मन्या बोका,
तुझा नवरोबाच ना गं?
कधी तरी प्रेमान वाग ना,
सदा भांडणच का गं?


मनीमाऊ मनीमाऊ,

तुझं आपलं बरं बाई.
नुसतंच हुंदडायचं पण,
अभ्यासाचं मात्र नाव ही नाही.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १२/०३/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित
Mani Mau

Tuesday, February 22, 2011

Birds Idol


एकदा साऱ्या पक्ष्यांचे Birds Idol भरले.
Judge म्हणून तोता मैना आणि मोर ठरले.

झाडून साऱ्या पक्ष्यांच्या audisions झाल्या.
सर्वांनी आपापल्या सरगम तन्मयतेने गायल्या.

गायनासाठी आला कोंबडी सह कोंबडा.
कुकूचकू करून पठ्यान dance केला रांगडा.

चिऊ आणि काऊ गायला जोडीन आले.
चिव-चिव काव-काव मस्त मजेन गायले.

वटवाघूळ अन घुबडाची स्वारी झोपेतच आली.
दिवसा गाता न आल्यान त्याची फजिती झाली.

कोकिळेला होता स्वता:च्या आवाजाचा गर्व.
म्हणे नाही गाणार जर गाणार असतील सर्व.

कबुतराला गायला हजर राहता नाही आलं.
अचानक एक Urgent निरोप द्यायचा गेलं.

उंच –उंच आभाळात फिरत राहीली घार.
गायला यायला तिला उशीर झाला फार.

मासोळी साठी बगळ्याने समाधी लावली पाण्यात.
Mood नाही आला त्याला गायला येण्यात.

अंतिम गायकांची लिस्ट जारी झाली.
चक्क चिऊ आणि काऊ final ला आली.   

चिऊला खालची पट्टी उत्तम जमली.
गाताना वरच्या पट्टीला ती फारच दमली.

काव काव गायनानं काउवर परीक्षक चिडले.
पण SMS च्या संख्येन त्याचे गुण खुप वाढले.

शेवटच्या फेरीत काऊ कुहू कुहू करून नाचला.
 पहिला Birds Idol जिंकून काऊने इतिहास रचला.

वर्षानुवर्षेचे उपकार कोकिळेने असे फेडले.
काऊ ऐवजी stage वर कुहू कुहू गीत गायले.

गीतकार: बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २२/०२/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित


Thursday, February 3, 2011

उंदीर दादा



तुरू-तुरू चालतो , ची-ची करून बोलतो.
चाहूल लागता माझी , दूर कोपर्‍यात पळतो.

मनी माउशी का रे तुझ सदाचच वाकड.
पाहताच तिला घाबरून तु गाठतोस बाकड.

उंदीर दादा - उंदीर दादा, थांब तर खरा.
माझी एक विनंती, ऐक ना रे जरा.

खेळायला माझ्याशी, आज चिंटू नाही आला.
भांडखोर चिंगीशी ,काल माझा अबोला झाला.

माझ्या या खेळात हो भिडू तु माझा.
बन तु भामटा चोर ,बनेन मी शूर राजा.

तु काय बुवा, गणेशाचा दोस्त!
ऐटीत बसतो बाजुला, लाडू करतो फस्त.

ये – ये उंदीर दादा,माझ एक काम कर ना रे.
गणेशाला सांगुन , खेळायला चांदोबा दे ना रे.


कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ३/०२/२०११
 प्रतिक्रिया अपेक्षित
(Undir Dada)