Tuesday, July 26, 2011

लेक लाडकी - उत्तरार्ध



लेक माझी लाडकी , भाग्य घेऊन आली.
सुख-दु:खाच्या क्षणात,साथ मला देत गेली.

आई वर जीव भारी,सर्वांची तू मोठी ताई.
काही अडता-नडता , तुज कडे धाव जाई.

तुज नसे कधीही,आळस कोण्या कामाचा.
हसत मुख सदा राही , ठाव नसे घामाचा.

आकाशी या स्थित होते,चंद्र,सूर्य अन् तारे.
पण मला न कळले , कसे फिरले ते वारे.

शब्दा मागून शब्द आले, वाढले दो मुखात.
परिणीती मग झाली, अबोला अन् दु:खात.

धन-दौलत , जमीन-जुमला, ना राही माझा-तुझा.
चार दिसांच्या जीवनी या,का ही अबोलाची सजा?

अखेरचे दिन आता, बघ माझे हे आले.
यमराज काल मला,आमंत्रण देऊन गेले.

आता एकवार तरी, जावस भेट तू देऊन.
राग ,द्वेष ,अभिमान, थोड बाजूस ठेऊन.

यमराजा थोपविले, दिली हजार कारणे.
आता तरी भेट मला,सोड तुझे ते धरणे.

वाट पाहणेची आता ,लेकी पार झाली हद्द.
नेण्या स्वर्गाच्या दिशेने,चित्रगुप्त आले खुद्द.

आता पर्वा ना जनांची, तोंड देईन निंदेस.
पण रोकेन शिवण्या, तो पिंड कावळ्यास.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २५/०७/२०११

Sunday, July 24, 2011

माझे बाबा - श्रध्दांजली




बालपण फुलवल माझ, सुसंस्कारित केलं मन|
भाग्य माझं थोर लाभलात पिता तुम्ही लक्ष्मण||
भरभरून दिलं सर्वांना,आपल्यात प्रेमाचाच गाभा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||१||

लाभली तुम्हांस अपत्ये सद्गुणी जणू नवरत्ने|
जीवनसाथी होती आनंदी,ना उतणे ना मातणे||
पसरल्या फांद्या दूरवर जणू तुम्ही वटवृक्ष उभा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||२||

अलौकिक होती बुद्धी,सोबत अथक कष्टांची साथ|
शून्यातून विश्व निर्मिले,केले भावंडांचे बळकट हात||
कर्तुत्व होते मोठे आपले, ना होता प्रगतीला थांबा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||३||

होते मोठे विचार आपले , वाणी होती खुप शुद्ध|
बोलणं जणू साखर पेरणी,ऐकणारा होई मंत्रमुग्ध||
सुधारित विचारांनी गाजल्या आपल्या उमेदीत सभा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||४||

प्रयोग केले मातीत अनेक, उत्तम केली शेती|
गुऱ्हाळाचा खेळ रंगवला,झाली दिगंत कीर्ती||
जपानी भात शेतीचा दिला ,पंचक्रोशीला धडा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||५||

समाजकार्याची होती तुम्हांस कायम भारीच आवड|
संसार सांभाळून सत्कार्यास काढली नेहमीच सवड||
भूषवून संस्थांत पदे विविध,दिला फक्त न्यायच सदा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||६||

तुम्ही छंद जपले खुप सारे जसे नवे अन् जुने|
क्रिकेट,सिनेमा,लाठी-काठी अन् शिकारीस जाने||
व्यायामास महत्व होते,मोडी भाषा तुम्हांवर फिदा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||७||

असे होता आपण बहुगुणी,सदगुणी, बहुश्रुत व्यक्ती|
साऱ्या घरादाराची शक्ती , जनसामान्यांची भक्ती||
होता तुमचा एकच मंत्र , मिळेल यश खुप राबा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||८||

अध्यात्माचा होता ओढा,नित्य असे हरिपाठाचा पाढा|
आषाढी एकादशी विठ्ठल आले, द्वादशी वैकुंठी घेऊन गेले||
खात्री आहे वैकुंठी असेल आपल्यासवे विठ्ठल तो उभा|
असे पावन झाले माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||९||

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २४/०७/२०११
Maze Baba

Sunday, June 19, 2011

कल्प भास



सांगू कशी प्रिया मी, हे गोड कल्प भास.
मी प्रेमवेडी राधा, तू प्राणसखा खास||धृ||

नयनास भार होते. स्वप्नील कल्पनांचे.
तुज पाहता सख्या रे,जणू स्वप्न रूप साचे.
मी मुरली रे कान्हाची,तू सुरांचा आभास||१||

सांगू कशी प्रिया मी, हे गोड कल्प भास.
मी प्रेमवेडी राधा, तू प्राणसखा खास.

बहरात यौवनाच्या, मी धुंद फुल व्हावे.
गंधित या फुलाने, तू स्वैर-भैर व्हावे.
ही पाकळी मिटावी,तुझा फुलारून श्वास||२||

सांगू कशी प्रिया मी, हे गोड कल्प भास.
मी प्रेमवेडी राधा, तू प्राणसखा खास.

गीतकार : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १९/०६/२०११
Kalp Bhas

Tuesday, June 14, 2011

विठ्ठला



विठ्ठला, विठ्ठला.
आषाढी-कार्तिकी वारीत देवा,
पूर भक्तीचा दाटला.

विठ्ठला, विठ्ठला.
संत मांदियाळी मोठी देवा,
तयास संकटी भेटला.

विठ्ठला, विठ्ठला.
रुसून गेली रखुमाई देवा,
ठाव कधी ना लागला.

विठ्ठला, विठ्ठला.
भेट पुंडलिका घेण्या देवा,
वाळवंटी युगे थांबला.

विठ्ठला, विठ्ठला.
नाम तुझे घेता देवा,
अंधार मनीचा मिटला.

विठ्ठला, विठ्ठला.
दर्श तुझे घेता देवा,
अभिमान मिथ्या सांडला.

विठ्ठला, विठ्ठला.
संग तया दिला देवा,
तुजला जो जो भजला.
  
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १४/०६/२०११
Vithala

Wednesday, May 18, 2011

जगदीश खेबुडकर



कोण्या हत्येने तुमचे घर काय जळले.
तयातुनच तुम्हा पहिले काव्य स्फुरले.
आशयघन काव्याचे सतत उधळले रंग.
मराठी मन आपल्या गीतात झाले दंग.

आकाशवाणीने घेतली तुमची दखल.
वसंत पवारांनी केले सिनेमात दाखल.
मिळाल्या संधीचे तुम्ही सोने हो केले.
सिनेमास लोकप्रिय गीतकार जे दिले.

लावणीकार म्हणून नाव प्रसिद्ध झाले.
तरी विविध गाण्यात सारे भाव आले.
आपली नवी असो वा गीत रचना जुनी.
कर्णमधुर अन अवीट आहेत सारीच गाणी.

कधी निर्माता ,दिग्दर्शक सांगे प्रसंग.
कधी संगीताच्या धूनेच ऐकून अंग.
सुंदर गीतास गोड रूप तत्काळ दावी.
कोल्हापूर नगरीचे, नाना तुम्ही शीघ्रकवी.

रसिकास दाविला प्रतिभेचा अविष्कार.
कलेच्या सेवेत झाला सारा जन्म साकार.
गुरु लाभले ऋषीतुल्य ग.दि.माडगूळकर
शोभे शिष्य तुम्ही गीतकार जगदीश खेबुडकर.


कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १८/०५/२०११

Jagdish Khebudkar

Saturday, April 30, 2011

बिचारा Subordinate



Corporate जगताची तर्हाच न्यारी.
कामाची Deadline, डोक्याला तापच भारी.
गप्प बसाव लागतं कितीही असाल Bright.
कारण असतं एकच “Boss is always right”
  
यशाच्या श्रेयाला असतात सर्वजण.
Failure ला मात्र नसतो वाली कोण.
Boss Safe करतो स्वतःच Fate.
बळी जातो मात्र बिचारा Subordinate.

HR च्या नव – नवीन Policy येतात.
Seminar,Training चे Classes होतात.
Employeeच्या पदरात फारस काय नसतं.
Training Institute मात्र उखळ पांढर होतं.

Increment ची वेळ जवळ येते.
Appraisal च वादळ तेज होते.
Performance च फक्त नावच असते.
Boss च्या पंटराना झुकते माप मिळते.

 ९ ते ५ चा तुरुंग तर असतोच.
वर Unpaid Overtime चा त्रास सोसतो.
बहुतेक Subordinate  मवाळ असतो.
काय करेल बिचारा? पापी पेट का सवाल असतो.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ३०/०/२०११


Sunday, April 3, 2011

संकल्प सिद्धी


 
मिळेल जीवनात खात्रीने जय.
पहिलं पक्क असावं अंतिम ध्येय.

स्वप्नरंजनातच न व्हावं चकित.
कागदावर ध्येयाच होऊ दे लिखित.

नवी कल्पना नित्य लिखितात भरु दे.
अंतिम ध्येयाला परिपूर्णत्व येऊ दे.

सार्‍या कल्पनांची आता योजना बनु दे.
प्राथमिकता महत्ते अनुक्रम ठरू दे. 

नुसत्या ध्येयाला ना आरंभ ना शेवट.
पूर्णत्वाची समय सीमा असावी चिवट.

आता ना कशाची वाट पहावी.
तत्काळ कार्याला सुरुवात करावी.

एक ही दिन ना व्यर्थ असावा.
अंतिम ध्येय प्राप्तीतच अर्थ दिसावा.

लिखित ध्येयाच महत्व सर्वास कळावं.
मनाजोग यश सर्वास मिळावं.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ०४/०४/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित
Sankalp Siddhi