Tuesday, July 26, 2011

लेक लाडकी - उत्तरार्ध



लेक माझी लाडकी , भाग्य घेऊन आली.
सुख-दु:खाच्या क्षणात,साथ मला देत गेली.

आई वर जीव भारी,सर्वांची तू मोठी ताई.
काही अडता-नडता , तुज कडे धाव जाई.

तुज नसे कधीही,आळस कोण्या कामाचा.
हसत मुख सदा राही , ठाव नसे घामाचा.

आकाशी या स्थित होते,चंद्र,सूर्य अन् तारे.
पण मला न कळले , कसे फिरले ते वारे.

शब्दा मागून शब्द आले, वाढले दो मुखात.
परिणीती मग झाली, अबोला अन् दु:खात.

धन-दौलत , जमीन-जुमला, ना राही माझा-तुझा.
चार दिसांच्या जीवनी या,का ही अबोलाची सजा?

अखेरचे दिन आता, बघ माझे हे आले.
यमराज काल मला,आमंत्रण देऊन गेले.

आता एकवार तरी, जावस भेट तू देऊन.
राग ,द्वेष ,अभिमान, थोड बाजूस ठेऊन.

यमराजा थोपविले, दिली हजार कारणे.
आता तरी भेट मला,सोड तुझे ते धरणे.

वाट पाहणेची आता ,लेकी पार झाली हद्द.
नेण्या स्वर्गाच्या दिशेने,चित्रगुप्त आले खुद्द.

आता पर्वा ना जनांची, तोंड देईन निंदेस.
पण रोकेन शिवण्या, तो पिंड कावळ्यास.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २५/०७/२०११

Sunday, July 24, 2011

माझे बाबा - श्रध्दांजली




बालपण फुलवल माझ, सुसंस्कारित केलं मन|
भाग्य माझं थोर लाभलात पिता तुम्ही लक्ष्मण||
भरभरून दिलं सर्वांना,आपल्यात प्रेमाचाच गाभा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||१||

लाभली तुम्हांस अपत्ये सद्गुणी जणू नवरत्ने|
जीवनसाथी होती आनंदी,ना उतणे ना मातणे||
पसरल्या फांद्या दूरवर जणू तुम्ही वटवृक्ष उभा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||२||

अलौकिक होती बुद्धी,सोबत अथक कष्टांची साथ|
शून्यातून विश्व निर्मिले,केले भावंडांचे बळकट हात||
कर्तुत्व होते मोठे आपले, ना होता प्रगतीला थांबा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||३||

होते मोठे विचार आपले , वाणी होती खुप शुद्ध|
बोलणं जणू साखर पेरणी,ऐकणारा होई मंत्रमुग्ध||
सुधारित विचारांनी गाजल्या आपल्या उमेदीत सभा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||४||

प्रयोग केले मातीत अनेक, उत्तम केली शेती|
गुऱ्हाळाचा खेळ रंगवला,झाली दिगंत कीर्ती||
जपानी भात शेतीचा दिला ,पंचक्रोशीला धडा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||५||

समाजकार्याची होती तुम्हांस कायम भारीच आवड|
संसार सांभाळून सत्कार्यास काढली नेहमीच सवड||
भूषवून संस्थांत पदे विविध,दिला फक्त न्यायच सदा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||६||

तुम्ही छंद जपले खुप सारे जसे नवे अन् जुने|
क्रिकेट,सिनेमा,लाठी-काठी अन् शिकारीस जाने||
व्यायामास महत्व होते,मोडी भाषा तुम्हांवर फिदा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||७||

असे होता आपण बहुगुणी,सदगुणी, बहुश्रुत व्यक्ती|
साऱ्या घरादाराची शक्ती , जनसामान्यांची भक्ती||
होता तुमचा एकच मंत्र , मिळेल यश खुप राबा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||८||

अध्यात्माचा होता ओढा,नित्य असे हरिपाठाचा पाढा|
आषाढी एकादशी विठ्ठल आले, द्वादशी वैकुंठी घेऊन गेले||
खात्री आहे वैकुंठी असेल आपल्यासवे विठ्ठल तो उभा|
असे पावन झाले माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||९||

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २४/०७/२०११
Maze Baba