प्रातःकाळीच्या सूर्याची प्रभा दिसे सोनेरी छान.
चारी बाजूनी निसर्गाची , आहे मुक्त उधळण.
धनवान ,गुणीजन गाजे पंचक्रोशीत नाव.
असा सर्वांग सुंदर आहे, देवर्डे माझा गाव.
असा सुजन लाभला गावच्या प्रत्येक आळीत.
स्वच्छ,”तंटामुक्त गाव” राहील कित्येक पर्वात.
जातपात भेद नाही भाईचारा भरून राही.
मना-मनात ,घरात रामराज्य नांदू पाही.
आहे मेहेरनजर खास, साऱ्या ग्रामदैवतांची.
नाही धन-धान्या तोटा, लयलूट समृद्धीची.
सुखसोई साऱ्या झाल्या वीज,पाणी,वाहतूक.
शिक्षणाचे केंद्र झाले, किती करावे कौतुक.
हिरण्यकेशीचा प्रवाह वाहतसे बारमाही.
शेत शिवार फुलते भात ,ऊस ठाई-ठाई.
चिरा इथला प्रसिध्द दूर गावो-गावी जाई.
भुईमुग ,मेसकाठी, काजू मस्त चलन देई.
म्हाई होई दरसाली रवळनाथ देवाची.
पाहुणे-राउळे जमती,येई आनंदा भरती.
चव्हाटी रंगे होळी घरोघरी पुरण पोळी.
फुलतो गोठण लुटण्या सोनं दसऱ्याच्या वेळी.
विठ्ठलाच्या राउळीं या,सदा वैष्णव भजती.
आषाढी-कार्तिकीची वारी,नाही कधी चुकविती.
गायराना गायी-म्हैशी चरुणी तृप्त होती.
“गौळदेव” ओढ्यात डुंबती,अंगी भरून मस्ती.
माझे नसीब हो थोर, मज लाभला हा गाव.
उतराई होईन मी, वाढवून कीर्ती, नाव.
माझ्या गावाची प्रगती होवो दिवसागणिक.
सर्व क्षेत्रांत राहो माझ्या, देवर्डेची उतुंग झेप.
Maza Gaav
खरच खुप छान
ReplyDelete