बालपण फुलवल माझ, सुसंस्कारित केलं मन|
भाग्य माझं थोर लाभलात पिता तुम्ही लक्ष्मण||
भरभरून दिलं सर्वांना,आपल्यात प्रेमाचाच गाभा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||१||
लाभली तुम्हांस अपत्ये सद्गुणी जणू नवरत्ने|
जीवनसाथी होती आनंदी,ना उतणे ना मातणे||
पसरल्या फांद्या दूरवर जणू तुम्ही वटवृक्ष उभा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||२||
अलौकिक होती बुद्धी,सोबत अथक कष्टांची साथ|
शून्यातून विश्व निर्मिले,केले भावंडांचे बळकट हात||
कर्तुत्व होते मोठे आपले, ना होता प्रगतीला थांबा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||३||
होते मोठे विचार आपले , वाणी होती खुप शुद्ध|
बोलणं जणू साखर पेरणी,ऐकणारा होई मंत्रमुग्ध||
सुधारित विचारांनी गाजल्या आपल्या उमेदीत सभा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||४||
प्रयोग केले मातीत अनेक, उत्तम केली शेती|
गुऱ्हाळाचा खेळ रंगवला,झाली दिगंत कीर्ती||
जपानी भात शेतीचा दिला ,पंचक्रोशीला धडा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||५||
समाजकार्याची होती तुम्हांस कायम भारीच आवड|
संसार सांभाळून सत्कार्यास काढली नेहमीच सवड||
भूषवून संस्थांत पदे विविध,दिला फक्त न्यायच सदा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||६||
तुम्ही छंद जपले खुप सारे जसे नवे अन् जुने|
क्रिकेट,सिनेमा,लाठी-काठी अन् शिकारीस जाने||
व्यायामास महत्व होते,मोडी भाषा तुम्हांवर फिदा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||७||
असे होता आपण बहुगुणी,सदगुणी, बहुश्रुत व्यक्ती|
साऱ्या घरादाराची शक्ती , जनसामान्यांची भक्ती||
होता तुमचा एकच मंत्र , ”मिळेल यश खुप राबा”|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||८||
अध्यात्माचा होता ओढा,नित्य असे हरिपाठाचा पाढा|
आषाढी एकादशी विठ्ठल आले, द्वादशी वैकुंठी घेऊन गेले||
खात्री आहे वैकुंठी असेल आपल्यासवे विठ्ठल तो उभा|
असे पावन झाले माझे अन् सर्वांचेच मोठे बाबा||९||
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २४/०७/२०११
Maze Baba
No comments:
Post a Comment