Sunday, March 27, 2011

निष्पाप


मुलीनंतर आता मुलगाच व्हावा.
कुटुंब चौकोन परीपूर्ण व्हावा.
इच्छित माझं पूर्ण झालं.
देवानं तुझ्यारूपे मला दान दिल.

कोवळं बाळरूप पाहून तुझ,
जीवन सार्थक झालं माझं.
वंशाचा दीपक आपसुक मिळाला.
चिंता काळजी आता गेले तळाला.

बाबांचे पाय जमिनीस ठरेनात.
ताईचे डोळे भरता भरेनात.
आप्तेष्ठ सारे पाहुन गेले.
सदिच्छांचे चारी बाजून लागले ठेले.

चोवीस तास तुझा आराम होता.
भूकेचाच काय तो सलाम होता.
नामकरण विधीचा तो शुभदिन ठरला.
सहस्त्र जेवणाचा बेत रचला.

कांही दिवस कोड कौतुकात गेले.
एक दिवस साऱ्यांचे जीव आढ्याला टांगले.
तुझा प्रतिसाद कांहीच नव्हता.
तु फक्त मांसाचा जिवंत गोळा होता.

डॉक्टर वैध्यांचे सारे यत्न झाले.
आखिर यश ना कोणास आले.
माझी काय बाळा चुक झाली होती.
तुझी सारी गात्रं मूक झाली होती.

नियतीन मोठी फसवणूक केली.
स्वप्नांच्या मोत्यांची पार माती झाली.
नशिबान विचित्र खेळ मांडला.
बाळा तुझ्यासाठी माझा रोम रोम रडला.

सुन सुन सारं जग झालं.
तुझ्या काळजीन मन सुन्न झालं.
बाळा तुझ भविष्य कस असेल?
एक एक दिवस नरक भासेल.

आता तुझ पालनपोषण हेच कर्तव्य.
जरी कांहीही करावे लागेल दिव्य.
आता दुःखालाच मानू खर सुख.
पाहुन तुझ निष्पाप मुख.

असा काय देवा होशी तु निष्ठुर?
क्षणभंगुर सुख आणि दुःखाचा महापुर.
असं जीवघेणा खेळ नको रे खेळू कोणाशी.
दयाघन , कृपासिंधु हीच ओळख तुझी सदा राहो साऱ्यांशी

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २७/०३/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित


Nishpap

Thursday, March 24, 2011

खरं स्वातंत्र्य



खुलं आकाश , मोकळी हवा.
विहरण हवं तिथं आणि हवं तेंव्हा.
कधी गाती गोड गाणी करून थवे.
गुज गोष्टी करती मुक्त वाऱ्या सवे.

खाणं पिणं जिथं मिळेल तिथं.
उद्याची काळजी चिंता कुठं?
स्वतःच्या मस्तीत मस्त जगणं.
कोणाची फिकीर ना पर्वा करणं.

मालक असती स्वतःच्या मर्जीचे.
ना आदेश देती ना मानती कोणाचे.
स्वातंत्र्य असतं हर तऱ्हेचं.
बंधन नसतं तसू भरच.

अरे माणसा बुद्धीचा तुला गर्व भारी.
शोध नवा लावशी रोज एक तरी.
पण असे स्वातंत्र्य तुला रे कुठे?
जे एका छोटयाश्या खगास भेटे.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १४/०३/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित
Khare Swatantrya

Saturday, March 19, 2011

होळी आली रे



आला रंगांचा सण.
मौज मस्ती धुमशान.
आज घराघरात पुरण पोळी रे.
आज वर्षाची होळी आली रे.

जन भेटीस जाऊ.
शुभेच्छा देऊ घेऊ.
लावु रंग गुलाल भाळी रे.
आज वर्षाची होळी आली रे.

रंगात रंगती सारे.
चहुकडे मस्तीचे वारे.
रंगात चिंब सारी झाली रे.
आज वर्षाची होळी आली रे.

सुरक्षेचं भान राखू.
शुध्द रंग उधळू माखू.
रसायन ,घाण नको मळी रे.
आज वर्षाची होळी आली रे.

राग-द्वेष ,मतभेद विसरू.
प्रेम,शांती चहुकडे पसरू.
होळी इडा पीडा दु:ख दर्द जाळी रे.
आज वर्षाची होळी आली रे. 

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १९/०३/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित
Holi Ali Re

Sunday, March 13, 2011

ते हायस्कूलचे सोनेरी दिन........

स्वप्न हायस्कूल, स्वप्न शहर,
पाचवीतच आला स्वप्नांना बहर.
अलंकार टॉकीजचे आता सिनेमे पाहीन.
उठली सर्वांगातून आल्हाददायी लहर.

व्यंकटराव हायस्कूलला झाला प्रवेश.
जणू उच्च शिक्षणाचा होता आवेश.
आज-याची शुद्ध भाषा होती “अरे-कारे”
माझ्या देवर्डे भाषेस बोलती “आरं” शुद्ध बोलणारे.

वाटले अभ्यास असेल फार जड.
म्हणून प्रयत्नांनी केले सर गड.
प्रयत्ने यशाची पावती मिळाली.
पाचवीतच पहिली पोजिशन आली.

Gathering चा होता शौक भारी.
पण झालेच नाही आठवी आली तरी.
आठवी – नववीत मात्र मजा आली.
Gathering ला भरपूर गाणी गायली.

क्रीडा महोत्सवांचा तो काळ काय वर्णु.
अखंड उत्साहाचा चहुकडे असे उत्सवच जणु.
 खो-खो ,कब्बडीचे भारी रंगत सामने.
AHS अन VHS असत आमने – सामने.

 रामतीर्थाच्या ओल्या सहली खास रमत.
चाळोबाच्या वनभोजानास येई न्यारी गंमत.
हंपी-बदामी ,विजापूर सहल केली मोठी.
कोल्हापुर ,गोवा ट्रीप असे अधून मधुन छोटी.

वर्ग बंधू होते शिवाजी ,संभाजी,
तान्या , रव्या ,विज्या अन नऱ्या.
वर्ग भगिनी होत्या सुवर्णा,कल्पना,
पिंटी ,रंजना,मंदा अन छाया.

लाभले खास सारेच गुरुजन.
संस्कारीत झाले अवखळ मन.
गजरे बाई ,चोडणकर,मोरवाडकर सर होते खास.
शिकवताना भरत अनोखे रंग हमखास.

आर.जी. कुरुणकर सर मुख्याध्यापक होते.
सिमला ग्राउंडवर पिटीला घेवडे सर सर्वव्यापक होते.
बी.टी. सुतार सर नी दिला कलेचा आस्वाद.
अष्टपैलू कलावंत होते, हे मात्र निर्विवाद.

मोरवाडकर सर माझ्या ब्याचचे होते सर्वेसर्वा.
विनामूल्य जादा क्लास असत जेंव्हा-तेंव्हा.
अखेर SSC - ८२  चे निकाल जाहीर झाले.
केंद्रात माझ्यासह पहिले सहा VHS चे आले.

सरस्वतीला आहे सदा वंदन माझे.
शाळेचे ते दिन जस चंदन ताजे.
दिवसामागून – दिवस किती ते गेले.
पण आठवणींचे ढग अजूनही ओले.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १२/०३/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित


(Te Highscool che Soneri Din)

Saturday, March 12, 2011

मनीमाऊ


मनीमाऊ-मनीमाऊ,
तुझं अंग किती गं मउ.
पायात सारखी घुटमळते,
करते माऊ माऊ.

भाचा तुझा वाघोबा,
मावशी तु त्याची.
पण केवढा मोठा तो,
मात्र तु छोटी कशी?

खेळायला कोणी नाही,
म्हणून चुपचाप बसतेस.
उंदीर भाऊ आला तर मग,
त्याला पळवून का लावतेस?

शेजारचा मन्या बोका,
तुझा नवरोबाच ना गं?
कधी तरी प्रेमान वाग ना,
सदा भांडणच का गं?


मनीमाऊ मनीमाऊ,

तुझं आपलं बरं बाई.
नुसतंच हुंदडायचं पण,
अभ्यासाचं मात्र नाव ही नाही.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १२/०३/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित
Mani Mau