Sunday, March 13, 2011

ते हायस्कूलचे सोनेरी दिन........

स्वप्न हायस्कूल, स्वप्न शहर,
पाचवीतच आला स्वप्नांना बहर.
अलंकार टॉकीजचे आता सिनेमे पाहीन.
उठली सर्वांगातून आल्हाददायी लहर.

व्यंकटराव हायस्कूलला झाला प्रवेश.
जणू उच्च शिक्षणाचा होता आवेश.
आज-याची शुद्ध भाषा होती “अरे-कारे”
माझ्या देवर्डे भाषेस बोलती “आरं” शुद्ध बोलणारे.

वाटले अभ्यास असेल फार जड.
म्हणून प्रयत्नांनी केले सर गड.
प्रयत्ने यशाची पावती मिळाली.
पाचवीतच पहिली पोजिशन आली.

Gathering चा होता शौक भारी.
पण झालेच नाही आठवी आली तरी.
आठवी – नववीत मात्र मजा आली.
Gathering ला भरपूर गाणी गायली.

क्रीडा महोत्सवांचा तो काळ काय वर्णु.
अखंड उत्साहाचा चहुकडे असे उत्सवच जणु.
 खो-खो ,कब्बडीचे भारी रंगत सामने.
AHS अन VHS असत आमने – सामने.

 रामतीर्थाच्या ओल्या सहली खास रमत.
चाळोबाच्या वनभोजानास येई न्यारी गंमत.
हंपी-बदामी ,विजापूर सहल केली मोठी.
कोल्हापुर ,गोवा ट्रीप असे अधून मधुन छोटी.

वर्ग बंधू होते शिवाजी ,संभाजी,
तान्या , रव्या ,विज्या अन नऱ्या.
वर्ग भगिनी होत्या सुवर्णा,कल्पना,
पिंटी ,रंजना,मंदा अन छाया.

लाभले खास सारेच गुरुजन.
संस्कारीत झाले अवखळ मन.
गजरे बाई ,चोडणकर,मोरवाडकर सर होते खास.
शिकवताना भरत अनोखे रंग हमखास.

आर.जी. कुरुणकर सर मुख्याध्यापक होते.
सिमला ग्राउंडवर पिटीला घेवडे सर सर्वव्यापक होते.
बी.टी. सुतार सर नी दिला कलेचा आस्वाद.
अष्टपैलू कलावंत होते, हे मात्र निर्विवाद.

मोरवाडकर सर माझ्या ब्याचचे होते सर्वेसर्वा.
विनामूल्य जादा क्लास असत जेंव्हा-तेंव्हा.
अखेर SSC - ८२  चे निकाल जाहीर झाले.
केंद्रात माझ्यासह पहिले सहा VHS चे आले.

सरस्वतीला आहे सदा वंदन माझे.
शाळेचे ते दिन जस चंदन ताजे.
दिवसामागून – दिवस किती ते गेले.
पण आठवणींचे ढग अजूनही ओले.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १२/०३/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित


(Te Highscool che Soneri Din)

No comments:

Post a Comment