कळेना आज माझा काय झाला गुन्हा.
अव्हेरशी का मज, आज पुन्हा पुन्हा.
निद्रेच्या विळख्यात तू , मज कळेना राज.
माझिया सख्याला , येऊ दे जाग.
तुजसाठी केला मी सारा शृंगार.
आसुसले मन ,तन झाले अंगार.
विराण भासे मज , तुजवीण सारे जग.
माझिया सख्याला , येऊ दे जाग.
मोहवू पाहे मज , रातराणीचा गंध.
पर तुझ्या गंधाचा , मज लागे छंद.
मर्दानी चेहऱ्यावर वाहे , पौरुष्याची झाग.
माझिया सख्याला, येऊ दे जाग.
संगतीत धावे काळ, थांबला जणू आज.
तुझी ना साथ , असे रातकिड्यांची जाग.
परसाच्या केवड्यात फुत्कारतो नाग.
माझिया सख्याला , येऊ दे जाग.
साहवेना तुझा दुरावा, आता एकही क्षण.
आवरू किती तयाला , स्वैर भैर मन.
पर जागवू कशी बाई, मज येई लाज.
माझिया सख्याला, येऊ दे जाग
उगवला बघ आता तो , पहाटेचा शुभ्र तारा.
कवळून मज , दे मिठीचा धुंद फुंद उबारा.
दीर्घ चुंबनात विरू दे , तुझा सर्व राग.
माझिया सख्याला , येऊ दे जाग.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे - २३ /११/२०१०
No comments:
Post a Comment